Saturday, 16 February 2013

One Beautiful day - Kondeshwar Amravati.

                               ही गोष्ट कधीची ते नेमके आठवत नाही हा पण माझा लहान भाऊ चिन्मय ह्याची मौंज होती तेव्हा, कदाचित ही २००१ साल ची गोष्ट कारण चिन्मय च्या मौंजेत मी ११ वी ला होतो आणि माझी त्रासदायक आणि वाईट ११ वी आणि १२ वी मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही, काय ती शाळा आणि काय ते शिक्षण नको रे बाबा न बोललेलेच बरे. मुंज म्हटले म्हणजे ब्राह्मण लोकांचा मोठा कार्यक्रम एक लहान लग्नच म्हणा ना, चालेल. मी भयंकर आळशी आणि या लग्न आणि मौंजेच्या कार्यात तर मी कधीच स्वतः ला झोकून टाकत नाही, अक्षरशा नाकी नौ येतो मी अश्या वेळेला. मला तसे बघता घरचा सर्वात मोठा भाऊ म्हणून ही जवाबदारी घायला हवी होती पण तरी मी ती झिडकारली, उलट मी जितकी काय कामे केले असेल ती फक्त मला काका ची 'लुना' चालवायला भेटेल ह्या उद्देशातून, चिन्मय मला माफ कर. 
                                     तर असाच एक दिवस, मुंज संपून काहि एक दिवस झाला असेन मला लुना चालवायला हवी होती, मी काकाना मागितली चाबी आणि निघालो लुना घेऊन. माझा विचार होता एक लांब चक्कर मारून यायचा, तसा मी निघालो सुद्धा हेच ठरवून की थोडा लांबच जाऊया, माझ्या हेमंत काका कडून मी पेट्रोल साठी २० रु घेतलेले, अश्चर्य नका वाटून घेऊ तेव्हा होत पेट्रोल इतक स्वस्त. मी बडनेरा जवळ असलेल्या कोंडेश्वर या तीर्थक्षेत्रात जायचे ठरवीले, कोंडेश्वर हे बडनेरा वरून ७-८ की मी अंतरावर, मग काय निघालो कोंडेश्वर च्या दिशेने.... जाताना रस्ते खूपच निसर्गमय आहेत सगळी कडे अगदी हिरवळ आणि हिरवळ, मी सामोर जाता जाता पहाडांकडे बघत होतो, खूप विशाल आणि हिरवे झालेले. मला कोंडेश्वर च्या मंदिराचा कळस दिसून पडला आणि मी माझी लुना ची स्पीड वाढविली. त्या वेळी काही मंदिराला असे मोठे भव्य द्वार नव्हते, पण आता आहे. मी लुना बाजू ला पार्क करून बेल फुल विकत घेतली आणि मंदिरात शिरलो.
                                           कोंडेश्वर चे शिवमंदीर खूप पुरातन असून या मंदिराचे बांधकाम राक्षसांनी केले आहे असे म्हणतात. मंदीर अनेक आश्चर्याने परिपूर्ण आहे. मंदिराच्या शिल्पावर काही हत्ती आहेत त्यांची संख्या मोजल्यास दर वेळी वेग वेगळी भरते. असे म्हणतात की त्या मंदिराचा 'नंदी' हा रोज तीळ  तीळ सरकतो, बाकी ह्याला काही ठोस पुरावा नाही. मी आत गेलो मधात सुंदर असे शिवलिंग होते मी त्यावर बेल फूल वाहिले आणि आत असलेल्या छोट्या छोट्या बारा जोतीर्लीन्गाचे दर्शन सुद्धा घेतले. मनात वाटत होते की घरी काही काम तर नसेल ?? पण तुम्हाला सांगतो मित्रांनो मला लग्न, गृहशांती,मुंज  असल्या लांबलचक  कार्यक्रमांचा भयंकर तिटकारा आहे, म्हणूनच मी फक्त 'रिसेप्शन' ला जातो एका घंट्यात मोकळं . तर मी शिवशंकराचे दर्शन घेऊन पुढल्या वाटेला निघालो. येतांना मोकळे असलेले आकाश आता काळे पडून गडगडू लागले होते, विजा अधून मधून माझे फोटो काढत होत्या, जोरदार सरी कोसळणार होत्या.
                                    अजून अर्धे सुद्धा आलो नसेल तर मला पावसाने झोडपून काढले, मला थंडी वाजत होती आणि भूक सुद्धा जोरदार लागली होती. लुना चिखलात फसून जाऊ नये म्हणून मी तिला एक झाडाखाली पार्क करून तिथे उभा झालो. थंडी वाढत होती, पाउस थांबत होता आणि पुन्हा जोराने थंड हवा वाहत होती, तर पुन्हा पाऊन कोसळत होता. दूर मला एक मंडप टाकलेला दिसला, पावसाने तो चिंब होता आणि हवेने हलत होता. मी हिय्या करून पावसात निघालो आणि धावतच मंडपात घुसलो, मंडप जरी ओला चिंब होता तरी आत पुष्कळशी कोरडी जागा होती. आत गावातील काही मंडळी बसली होती आणि पंगती वाढल्या जात होत्या, त्यांना पाउस जोरदार होवून मंडप गळू लागायच्या पहिले कदाचित जेवणे उरकायची असणार. 

"कोण ?? सद्या  कारे ?? आर जेव ना राजा का ओला  झाल्यावर जेवतो ?" एक व्यक्ती मला म्हणाला.

"मी सद्या नाही भाऊ, मी असाच आल्तो दर्शनाले, ...... माय नाव तन्मय" मी बोललो.

"आसं ??? कोण गावचे ??? " तो व्यक्ती बोलला 

"बडनेरा " मी 

"बर बर ...... काय नाव म्हनल?? तनमन ????" एक आजी विचरत होती.

मी "नाही आजी, तनमन नाही तन्मय..... तन्मय देव " 

"होका ??? देव डाक्टर ?? ते कोण तुमचे ??" त्या पहिल्या व्यक्तीने विचारल.

"माझे आजोबा आहे  ते........... वारले ते दोन वर्ष्या आधी  " मी 

असे म्हटल्यावर त्या आजीने एकदम माझा हात धरला आणि म्हणाली "आर देव डाक्टर म्हणजे देव होते रे खरे खुरे, ये बाप्पा तू नातू हास त्यांचा जेव मा थोड, लाय बरसात हाय जा थोड्या दमान घरी "

                                    माझे आजोबा खरच देव होते त्यांच्यावर त्यांच्या पेशंट चे खूप प्रेम होते, मी तसा सुद्धा उपाशी होतो आणि भूक सुद्धा जाम लागलेली आणि त्यात समोर मस्त रस्सा भाजी वांग्याची आणि खमंग रोडगे, रोडगे म्हणजे कणकीचे मोठे गोळे तेल लावून गोल करायचे आणि आगीत भाजायचे आणि तूप घेऊन रस्सा भाजी सोबत खायचे, आमच्या विदर्भातील लोकांचा हा आवडता पदार्थ. मी मस्त रोडग्या वर ताव मारला आणि त्यांना धन्यवाद देवून तिथून पाउस कमी  झाल्यावर निघालो. संपूर्ण रस्ता पाण्याने नाहून निघालेला होता. लुना रस्त्यावरून जात असतांना रस्ता पाण्याने चमकत होता. मी थोडा समोर गेलो असेन तर मला एक हरणांचा कळप धावत आत झाडाझुडपात जातांना दिसला. माझ्या घराच्या मी जवळच आलो होतो तर एका टपरी वरून येणाऱ्या गरम चहाच्या सुगंधाने माझे लक्ष्य तिकडे वळविले. मी चहाच्या एक एक सिप सोबत ओल्या मातीचा सुगंध घेत होतो. त्या मृदगंधाने माझे मन प्रफ्फुल्लीत झाले होते, आणि बाजूलाच लोकांचे बोलणे घोळक्याने सुरु होते.

"काय पाउस आला लेका,.......... नाही काय रे ???"

मी हसत हसत लुना सुरु केली आणि माझ्या घरच्या दिशेने निघून गेलो.
                                     

1 comment: